श्री श्री रविशंकर :
नाती ही तुमच्या मनाचे सामर्थ्य बनू शकतात किंवा कमजोरी. जर मन खंबीर असेल तर नाती म्हणजे देवाची देणगी होऊ शकतात पण जर मन कमकुवत असेल आणि आपल्या ताब्यात नसेल तर नाती म्हणजे बंधन वाटू शकतात. तुम्हाला स्वत:ला कसे बघायला आवडेल? आनंदी आणि खळाळत्या उत्साहाने भरलेले की गळून गेलेले आणि खूश करायला कठीण? जर एखाद्याला सतत लोकांच्या मनधरण्या करून खूश ठेवावे लागत असेल तर ते किती थकवून टाकणारे असेल? जे लोक लांब चेहरा करून बसतात आणि लोकांनी त्यांच्या मनधरण्या कराव्या असे ज्यांना वाटत असते त्यांच्यापासून लोक दूर पळत असतात. प्रेमी युगुल बरेचदा असेच करतात. ते आपली बरीचशी शक्ती दुसऱ्याला खूश ठेवण्यात घालवतात त्यामुळे त्या क्षणातला आनंद आणि मजा कमी होते. क्वचित कधीतरी तुमच्या मनाची अस्वस्थता व्यक्त करून दाखवणे ठीक आहे पण तसे परत परत करत राहिले तर ते तुम्हाला आणि तुमच्या प्रेमिकेलाही दमवून टाकेल. जर तुम्हाला उदास वाटत असेल तर तुम्ही स्वत:चीच मनधरणी करून खुश करा. दुसऱ्या कुणीतरी तुम्हाला खुश करण्याची गरज असणे हे जडत्वाचे लक्षण आहे. हेच अज्ञानाचे मूळ आहे. जर तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचे असेल (attention) तर ताण (tension) येणारच.
नातेसंबंधांचे एक गुपित आहे. स्त्रियांनी कधीही आपल्या नवऱ्याला कमी लेखू नये. तुम्ही जर तुमच्या नवऱ्याला म्हणालात की, “तू कुचकामी आहेस, काही कामाचा नाहीस, आळशी कुठला”. तर त्याच्या स्वाभिमानाचे खच्चीकरण होते आणि तो खरोखरच काही कामाचा रहात नाही. तो कितीही कुचकामी असला, कमजोर असलातरी तुम्ही त्याला नेहमी तोच सर्वोत्तम आहे असे म्हटले पाहिजे. त्याचा अहंकार पोसला पाहिजे. सगळं जग म्हणू दे की त्याला अजिबात डोकं नाही पण तुम्ही तसे मानता कामा नये. बायको म्हणून तुम्ही म्हणायला हवे की, “जगात तुम्हीच सर्वात हुशार आहात. आता तुम्ही ती हुशारी वापरत नाही याचा अर्थ तुमच्याकडे ती नाही आहे असे नाही”. त्याचप्रमाणे पुरुषांनी कधीही बायकोच्या भावनांवर पाणी ओतू नये. स्त्रियांना भावनिक बांधिलकीचे फार महत्व असते. तुम्ही तिच्या पालकांना कधीही नावे ठेवू नयेत. तिचे वडील, आई किंवा भाऊ, बहिण कोणीही. जर ती त्यांना नावे ठेवू लागली तरी तुम्ही गप्प बसा. काहीही बोलू नका. जर तुम्ही तिच्या पालकांविरुध्द बोललात तर तुम्ही गोत्यात याल आणि जर तुम्ही त्यांची बाजू घेतलीत तर ती एकटी पडेल. त्यामुळे गप्प बसा. तिथून निघून जा किंवा विषय बदला.
नातेसंबंधात जर दोघेही देणाऱ्याच्या भूमिकेत असले तर काही प्रश्न नाही. पण जर दोघांनाही निव्वळ घ्यायचे असेल तर भांडणे होणार हे नक्की.
“मला काही तरी करायचे आहे. मी तुझ्यासाठी काय करू?” अशी जर तुमची वृत्ती असेल तर तुमचे संबंध दीर्घकाळ पर्यंत टिकतील. त्याचप्रमाणे नातेसंबंधाची जास्त चिंताही करू नका. निवांत रहा आणि तुम्हाला दिसेल की तुमचे लोकांबरोबरचे संबंध सुधारतील. तुम्ही जर गोचीडीसारखे कुणाला चिकटून राहिलात आणि कटकट करत राहिलात तर मग तुम्ही अगदी गोड बोलत असलात तरी ती व्यक्ती तुमच्यापासून पळून जाईल. कारण त्यांना ते झेपणार नाही.
एक बाजू आहे प्रेम करण्याची, दुसरी आहे प्रेम कसे सांभाळायचे आणि कसे स्वीकारायचे याची. त्यासाठी अगदी संतुलीत आणि सिध्द व्यक्तीच लागते. तुम्ही स्वत:बरोबर अगदी आरामशीर रहायला हवे. जर तुम्ही स्वत:बरोबर आरामशीर असलात तर सगळेच लोक तुमच्याबरोबर आरामात राहतील. तुम्ही जसे आहात तसे रहा. अगदी स्वाभाविक आणि साधे रहा. नातेसंबंधाचा विकास आपोआप होतो. जर तुम्ही मुद्दाम नातेसंबंध जुळवण्याचा प्रयत्न केलात तर ते जरासे कृत्रिम आणि अनैसर्गिक होईल. तुम्हाला कुणी तुमच्याबरोबर अगदी प्रामाणिक, मोकळे, स्वाभाविक रहायला हवे असेल तर दुसऱ्यांनाही तुमच्याकडून तशीच अपेक्षा असते. जर तुम्ही वरिष्ठ अधिकारी असलात तर तुम्हाला तुमचे कनिष्ठ लोक कसे असायला हवे असतील? कनिष्ठ मनमोकळा हवा असेल तसेच तुमच्या वरिष्ठांनाही हवे असते. वरिष्ठांना किंवा तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला खूश करण्याचा अति प्रयास करू नका. त्यामुळेच सगळी गडबड होते. सर्वात उत्तम म्हणजे तुम्ही जसे आहात तसे, स्वाभाविक राहणे, क्षमाशील असणे, आणि वर्तमान क्षणात राहण्याने खूपच फरक पडतो.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org/mr
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri