श्री श्री रविशंकर :
बाहेर पडण्याच्या वाटेशिवाय गल्ली,खजिन्याशिवाय राजा,व्यवसायिकाशिवाय व्यवसाय आणि गुरुशिवाय जीवन हे सगळेच व्यर्थ आहे.इथे एक प्रश्न उद्भवतो की 'गुरु' असण्यावर इतका जोर का दिला जातोय ? आपल्याला गुरुची आवश्यकता का आहे ?
आज प्रत्येक प्राणीमात्राला आनंदी राहायचे आहे. धन असो, भक्ती असो किंवा शरीरसुख असो सगळे काही आनंद मिळवण्यासाठी आहे.
आपण आनंदी राहण्यासाठी काही ना काही शोधत असतो. पण ते मिळाल्यावरही आनंद नसतोच. शाळेत जाणाऱ्या मुलाला वाटते की तो महाविद्यालयात गेला की तो आनंदी होईल, स्वतंत्र होईल. आणि तुम्ही एखाद्या कॉलेजात जाणाऱ्या मुलाला विचारले तर तो म्हणतो की त्याला नोकरी मिळाली की तो आनंदी होईल. नोकरी लागलेल्या एखाद्या माणसाशी बोलाल तर तो त्याच्या जीवनसाथीच्या शोधात असतो. ज्यांना जीवन साथी मिळाला आहे त्याच्या डोक्यात मूल होण्याचा विचार चालू असतो. ज्यांना मुले आहेत त्यांना विचारलं की ते आनंदी आहेत का? तर ते म्हणतात की मुलं जोपर्यंत चांगली निघत नाहीत तो पर्यंत आनंदी कसे रहाणार ? आता अशा एखाद्या व्यक्तीला विचारा जो निवृत्त झाला आहे, सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाली आहे तर तिला तिच्या तरुणपणीचे दिवस आठवत असतात. तणाव तर सर्वांच्याच जीवनात घर करून बसला आहे.
प्रत्येकजण भविष्यातल्या कुठल्यातरी आनंदाची तयारी करतोय. हे म्हणजे असे आहे की, संपूर्ण रात्र झोपण्याच्या तयारीतच गेला आणि झोपायलाच मिळाले नाही. जीवन कधी कधी खूप गुंतागुंतीचे वाटते. इथे आनंद आहे, दु:ख आहे, उदारता आहे, लोभ आहे, राग आहे आणि वैराग्य आहे. इतकी सगळी विरोधी मूल्यं डोक्यात असली की डोकं फुटायची वेळ येते.
हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला अशा विवेकाची आवश्यकता असते की जो तुम्हाला अशा कठीण समयी मार्गदर्शन करू शकेल. गुरु म्हणजेच तो विवेक आहे. तुमच्या हे लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही कोणत्याही अडचणीत नसता तेव्हा तुम्ही चांगला सल्ला देऊ शकता. पण जेव्हा तुम्ही अडचणीत सापडता तेव्हा तुम्हाला ते पटत नाही. जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून बाहेर येता तेव्हाच तुमचा विवेक जागृत होतो. गुरु तोच असतो जो कोणत्याही अडचणीत नसतो तर अडचणींमध्ये राहून अडचणींकडे बघतो.
गुरु एखाद्या सर्किट ब्रेकर सारखा असतो. जेव्हा तुम्ही तुमचे जीवन सांभाळू शकत नाही तेव्हा गुरु येतात आणि तुमचे रक्षण करतात, जेणेकरून तुम्ही संतुलित राहाल. तुमच्या बरोबर असलेले कुणी जर सारखे तुमच्यावर मागण्या लादत असतील तर गुरु तुम्हाला मदत करतात. तुमच्या सगळ्या इच्छा, पीडा गुरूला समर्पित करून टाका. गुरु लाभणे याचा अर्थ आहे सदैव विश्रांत राहणे, हसत रहाणे,आत्मविश्वासाने चालणे आणि निर्भय राहणे.
श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org/mr
Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri