टोनी मॉरिसनने तिच्या ‘द ब्लूस्ट आय’ या कादंबरीत एका मुलीची गोष्ट लिहिली आहे, ज्यामध्ये ती मुलगी तिच्या सौन्दर्यावर खूष नव्हती. तिला निळे डोळे हवे होते, परंतु तिचे काळे होते. तिची इच्छा होती की तिचे आरामदायक आणि मोठे घर असावे, परंतु तिच्या घरात सुख नव्हते. तिचा कमकुवत स्वाभिमान हा तिच्या अकार्यक्षम कुटूंबातील तिच्यावरील प्रेमाच्या पूर्ण अभावामुळे होता, असे दिसत होते.
आपल्यापैकी कित्येकांनी असेच दुःखी क्षण घरी, शाळेत, सहकाऱ्यांसोबत किंवा कुटूंबियामध्ये अनुभवले असतील. आपण नेहमी असेच समजत आलो की आपण पुरेसे चांगले नाही. आपल्यापैकी कित्येकांनी चांगली सुरुवात अनुभवूनसुध्दा नंतर आलेल्या अपयशांमुळे आत्मविश्वास किंवा स्वत्व नष्ट केले. तरीही, काहीजणांनी त्यांच्या मनासारखे होत असलेले अनुभवले असले तरी सततच्या नकारात्मक स्वभावामुळे त्यांना इजा होऊ शकते.
कारण काहीही असो, खाली दिलेल्या टीपा पाळून तुम्ही तुमचे गमावलेले चैतन्य आणि स्वत्व पुन्हा मिळवू शकता:
१. तुम्ही अन्यायाला बळी पडलेले आहात असा विचार करणे थांबवा
तुम्ही प्रतिकूल परिस्थिती आणि लोकांचे बळी होता असे जितके अधिक तुम्हाला वाटते तितके तुम्ही दुर्बल होत जाल. स्वतःस बळी मानायचे थांबवण्याची वेळ आली आहे. आपला भूतकाळ एका स्वप्नासारखा पहा आणि सिंहाच्या आविर्भावात भविष्याकडे पाहा!
२. विनाकारण मनावर असलेला बोजा काढा
तुमचा छळ केला होता, तुम्हाला खाली खेचले गेले आणि तुम्ही अपयशी आहात असे ज्या वेळेस तुम्हाला वाटले होते, ते सर्व प्रसंग तुमच्या मनावरचा बोजा वाढवितात. अस्वस्थ स्मृतीशी निगडीत अशी प्रत्येक भावना तुमचा स्वत्व परत मिळविण्याचा किंवा आत्म-सन्मानाचा पाया खराब करते. आत्मविश्वास मिळविण्यासाठी हे सर्व सोडणे आवश्यक आहे. परंतु इतके दिवस आपल्या मनाचा ताबा घेऊन बसलेल्या भावना कशा सोडायच्या? ध्यानातून!
ध्यानातून स्वत्व परत मिळविता येते ही वस्तुस्थिती आहे. ध्यान मनातील त्रासदायक भावना काढून तर टाकतेच, शिवाय तुम्हाला परत तुमच्या स्वत्वाबरोबर जोडते आणि स्वस्थ विश्रांत बनवते. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आरामात असता तेव्हा तुमच्या स्वत्व आणि आत्मविश्वासास प्रचंड उत्तेजन मिळते.
३. स्वतःबरोबरचे नकारात्मक बोलणे कटाक्षाने टाळा
कधीकधी स्वतःच्याच निरंतर शंका आणि नकारात्मक स्वगताने आपले मन आपल्याला खाली खेचत असते. आपल्या उणीवांवर कुरकुर करण्याऐवजी त्या सोडवण्यावर भर द्या. कोणत्याही नकारात्मक आंतरिक संवादात अडकण्याऐवजी असा संवाद मनातून जाईपर्यंत त्याचे निरीक्षण करा.
४. स्वतःशी स्पर्धा करा
इतरांशी स्पर्धा केल्यामुळे तुम्ही स्वतःकडून अवास्तव अपेक्षा करू लागता. ही अशी प्रवृत्ती आहे, ज्यामुळे स्वत:स हानी पोहचविणार्या भावना निर्माण होतात. ही प्रवृत्ती तुम्हाला अधिक उत्पादनक्षम तर बनवत नाहीच, शिवाय आनंदसुध्दा देत नाही.
तथापि, स्वतःशीच स्पर्धा केल्यामुळे तुम्ही अधिक उत्पादनक्षम बनता आणि तुमचे स्वत्व आणि आत्म-सन्मान देखील वाढवू शकता. म्हणून आपल्या शेजारी असलेल्या व्यक्तीशी स्पर्धा करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आधीच्या दिवसापेक्षा आणि मागील वर्षापेक्षा अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न करा!