ब्राह्ममुहूर्ताबद्दल आपल्याला आवश्यक सर्व माहिती

रोज सकाळी ४.३० वाजता, माझे आजोबा देवघरात त्यांचे मंत्र पुटपुटत देवांना उठवण्यासात गर्क असत. ते झाल्यावर, ध्यान करायचे आणि मग लांब चालायला जायचे.

"आहा, काय सुंदर सकाळ आहे" घरी परतल्यावर दररोज ते असंच म्हणायचे.

ब्रम्ह म्हणजे ज्ञान आणि मुहूर्त म्हणजे विशिष्ठ वेळ. ब्राह्ममुहूर्त म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठीची योग्य वेळ.

माझ्या आजोबांचे आणि पहाटेचे खास नाते आहे, विशेष करून ब्राह्ममुहूर्ताची वेळ, सूर्योदयापूर्वी दिड तास. इतकं की कडाक्याच्या थंडीत सुद्धा ते त्यांचा नेम पाळतात. त्यांचा असा विश्वास आहे की रोज पहाटे उठण्याच्या सवयींमुळेच त्यांची तब्येत अजून धडधाकट आहे. (वय ८० च्या घरात असूनसुद्धा ते ताठ चालतात आणि बसतात आणि कुठलेही आजार नाहीत.)

पूर्वीपासूनचे वैद्यकशास्त्रातील तज्ञ पण त्यांच्याशी सहमत आहेत. अष्टांग हृदय, आयुर्वेदावरील ग्रंथ असे म्हणतो की, ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने आयुष्य वाढते आणि आजार दूर राहतात.

ब्राह्ममुहूर्त: 'स्वतःच्या वेळाची' पुनर्व्याख्या

निरोगी शरीर आणि वाढलेले आयुष्य यांचे फायदे आकर्षक आहेत. तरीही, माझ्या आजोबांच्या भल्या पहाटेच्या प्रेमाचा उगम कुठेतरी खोलवर आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, तो त्यांचा "स्वतःचा" वेळ आहे. त्यांनी मला सविस्तर सांगितले. त्यांनी सांगितले की सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जगाच्या मागण्या मान्य करत असतो. संपूर्ण दिवस व्यावसायिक, सामाजिक आणि पारिवारिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात जातो. रात्री अगदी थोडा वेळ स्वतःसाठी शिल्लक राहतो. पण तेव्हा आपण पुरते दमून गेलेलो असतो. अशी वेळ जेव्हा तुम्ही उत्साही, सजग आणि सहज तादात्म्य पावू शकता, ती म्हणजे ब्राह्ममुहूर्त, आणि म्हणूनच ती वेळ तुमच्या साठी खास असते.

ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने, संशोधनातून पुढे आलेले फायदे

इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगा अॅण्ड अॅलीड सायन्स नुसार, सूर्योदयापूर्वी वातावरणात नुकताच तयार झालेला प्राणवायू भरपूर प्रमाणात असतो. असा प्राणवायू रक्तामधील हिमोग्लोबिन मध्ये लगेच मिसळून आॅक्सिहिमोग्लोबिन तयार करतो. त्यांचे फायदे असे आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

उर्जेची पातळी वाढते

रक्ताच्या pH चा समतोल राखण्यासाठी मदत होते

थकवा, वेदना आणि पेटके यातून सुटका

क्षार आणि जीवनसत्त्वे चांगली शोषली जातात.

या स्वतःच्या वेळात करण्याची ५ कामे

आपल्या पूर्वजांनी ब्राह्ममुहूर्तावर करण्यासारख्या काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, ज्या केल्याने स्वतःशी एकरुप होण्याला मदत होते. या गोष्टी केल्याने तुमचा हा स्वतःबरोबरचा वेळ, वैयक्तिक आणि सामाजिक या दोन्ही पातळ्यांवर आणखीनच वैशिष्ट्यपूर्ण व फलदायी ठरतो. धर्मशास्त्र, धर्मावरील हिंदू प्रबंध आणि अष्टांग आयुर्वेद या जुन्या ग्रंथांमध्ये काही गोष्टी सुचवल्या आहेत:

ध्यान

ध्यान हा स्वत:ला भेटण्याचा उत्तम मार्ग आहे. आणि सगळं जग झोपेत असताना ध्यान करण्याशिवाय आणखी कुठली वेळ चांगली असणार? या वेळेलाच तुमची सजगता उत्कृष्ट असते. ब्राह्ममुहूर्तावर जे ध्यान करू शकतो त्यापैकी एक म्हणजे सहज समाधी.

ज्ञान वाचा किंवा ऐका

अष्टांग हृदय प्रमाणे, ज्ञान व शहाणपणा मिळवण्यासाठी ब्राह्ममुहूर्त ही अतिशय योग्य वेळ आहे. जुने धार्मिक ग्रंथ वाचा किंवा शहाणपणा सांगणाऱ्या छोट्या गोष्टी वाचा. धर्मशास्त्रानुसार, ब्राह्ममुहूर्तावर केलेला शास्त्राभ्यासाने मानसिक अडचणी सोडविण्यासाठी मदत होते.

योजना बनवा

काम असो, पैसे असो किंवा पुढचा दिवस असो; ब्राह्ममुहूर्त जी सजगता आणि उत्साह देतो त्यामुळे हा वेळ महत्त्वाच्या गोष्टींचे नियोजन करण्यासाठी योग्य ठरतो.

आत्मनिरीक्षण

आधीच्या दिवसाच्या तुमच्या कृती आठवा. किती वेळा मत्सर, राग आणि हाव या भावना तुमच्या मनात आल्या. यातील कुठल्याही आठवणींनी तुम्हाला अपराधी भावनेमध्ये अडकवू देऊ नका. या क्षणांबद्दल सजग व्हा. असे रोज केल्यामुळे, याभावनांंच्या आहारी जाण्याची तुमची सवय हळूहळू कमी होईल, आणि वाईट कर्मे कमी होतील.

तुमचे पालक, गुरू आणि देव यांची आठवण काढा

दिवसभराच्या कामाच्या गर्दीत, आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींची आठवण काढायला वेळच मिळत नाही. आई-वडील, गुरू आणि हे जग चालवणारी शक्ती ज्यावर तुमचा विश्वास आहे, त्याला देव म्हणा किंवा वैश्विक शक्ती, तिला या समयी मनातल्या मनात आठवून नमस्कार करा असे शौनक ऋषी सुचवतात.

 

ब्राह्ममुहूर्तावर करु नयेत अशा गोष्टी

धर्मशास्त्रानुसार टाळण्याच्या गोष्टी:

अन्न सेवन करु नये: ब्राह्ममुहूर्तावर अन्न सेवन केल्याने आजारपण येते.

ताणतणाव येतील अशी कामे करु नये: खूप जास्त मानसिक काम पडेल अशी कामं करू नयेत. असे केल्याने आयुष्य कमी होते.

प्रत्येकाने ब्राह्ममुहूर्तावर उठले पाहिजे का?

अष्टांग हृदय प्रमाणे धडधाकट माणसानेच ब्राह्ममुहूर्तावर उठावे. खालील लोकांना ब्राह्ममुहूर्तावर उठण्यापासून रोखले आहे.

गरोदर स्त्रिया

लहान मुले

सुरुवातीपासूनच ज्यांना लवकर उठायची सवय नाही असे वृद्ध

शारीरिक किंवा मानसिक आजार असलेले रोगी

ज्यांचे आधीचे जेवण पचलेले नाही असे लोक (पोट साफ न होणे म्हणजे अन्न पचलेले नसणे)

 

डॉ. अंजली अशोक, श्री श्री आयुर्वेद आणि पंडित विश्वजीत, वेद आगम संस्कृत महा पाठशाळा यांनी दिलेल्या माहितीवर आधारित

लेखिका: वंदिता कोठारी